गोसेवा

श्री क्षेत्र काशी (वाराणसी) आश्रम

img

"कर्म करो गोदा तटी, तप करो नर्मदा तटी, देह छोडो काशी ।" निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज आपल्या अवतारकार्यात संपूर्ण भारतभर फिरले. आपल्या शिष्यांसमवेत अनेक तीर्थयात्रा बाबाजींनी केल्या. हिंदू धर्मामध्ये काशी तीर्थक्षेत्राचा महिमा मोठा असून मनुष्य जन्मात एकदा तरी काशीची यात्रा करावी असे म्हटले जाते. अशा या काशी नगरीमध्ये येणाऱ्या आपल्या भक्तांसाठी आश्रम असावा अशी बाबाजींची ईच्छा होती; मात्र बाबाजींची ती ईच्छा त्यावेळी अपूर्ण राहिली होती. परमपूज्य बाबाजींच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या कार्याचा अहोरात्र ध्यास घेतलेल्या उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी अथक प्रयासातून २००७ साली अध्यात्माची राजधानी असलेल्या काशीनगरीत गंगेच्या तीरावर भव्य आश्रमाची उभारणी करून आपल्या गुरुमाऊलींची अखेरची ईच्छा पूर्ण केली.

गंगेच्या तीरावर, गायघाटाच्या समोर, डोमरी गावाच्या बाजूला अगदी विस्तीर्ण ९ एकर जागेत श्री बाबाजींचा भव्य आश्रम उभा आहे. आश्रमामध्ये येणाऱ्या भक्तांसाठी भक्तनिवास बांधण्यात आले असून आश्रमात पार पडणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक भवन आहे. आपल्या संस्कृतीमध्ये गायीला आईचा दर्जा दिला जातो व पूज्य बाबाजींनीही गायीच्या सेवेला विशेष महत्व दिले आहे. ज्याच्या घरी गाय | त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय || म्हणून बाबाजींच्या प्रत्येक आश्रमामध्ये गायींची सेवा केली जाते. काशी आश्रमातही गोशाळा असून यामध्ये देशी गायींचे संगोपन केले जाते. श्री बाबाजींची सुंदर अशी कुटिया याठिकाणी असून देशभरातून येणाऱ्या संतांच्या व्यवस्थेसाठी संतनिवास आहे.

img
img

येथे येणाऱ्या भाविकांच्या पूर्वजन्मीच्या पापाचं क्षालन व्हावं म्हणून पूज्य बाबाजींच्या संकल्पनेतून दोन वर्षापूर्वी येथे ‘नारायण तीर्थकुंड’ बांधण्यात आले. या तीर्थकुंडामध्ये श्री गणेश, श्री लक्ष्मीमाता, श्री बाबाजी, श्री शनी महाराज, श्री हनुमानजी, श्री कुबेर, ब्रम्हा-विष्णू-महेश आदी देवतांचे अधिष्ठान स्थापन करण्यात आले आहे.

सनातन काळापासून आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा चालत आलेली आहे. भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र यांनी गुरूगृही राहून शिक्षण घेतले व एक आदर्श निर्माण केला. अनादी काळापासुन चालत आलेली या गुरुकुल परंपरेतून सुसंस्कारीत पिढी घडवण्यासाठी प.पु. बाबाजींनी वेरुळ, टूनकी व उगाव खेडे याठिकाणी गुरुकुलाची स्थापना केली. स्वामी शांतिगिरी बाबांनी ही परंपरा अगदी 'बाप से बेटा सवाई' याप्रमाणे अखंडरित्या सुरु ठेवून महालगाव, उपखेड, सवंदगाव एवढेच नव्हे तर महाराष्ट्रापासून १२०० कि.मी. दूर काशी आश्रमातही गुरुकुल सुरु केले. आजमितीस २५० मुले येथे शिक्षण घेतात. तसेच वैदिक शिक्षणासाठी वेद पाठशाळाही बाबाजींनी येथे सुरु केली आहे.

समाजामध्ये अनेक लोक हे नैराश्याच्या गर्तेत जगत असतात. तर काही मनशांतीसाठी भटकत असतात. अशा लोकांना आश्रमात आल्यावर मनशांती लाभावी यासाठी बाबाजींनी आश्रमामध्ये श्री शांतीश्वर महादेवांचे मंदिर बांधले आहे. संन्यासी सत्पुरुषाने बांधलेले मंदिर हे ज्योतिर्लिंगासमान असते म्हणून अनेक भाविक येथे अभिषेक पूजा-विधी करून मनशांती प्राप्त करून घेतात. हिंदू धर्मशास्रामध्ये जन्माला आल्यावर एकदा तरी काशीची यात्रा करावी असे म्हटले जाते. परंतु काशीची यात्रा तितकी सोपी नसते. केवळ बाबाजींमुळे आपल्याला काशीची यात्रा सुकर झाली आहे. हे मोठे उपकार बाबाजींचे आपल्यावर आहे. जय बाबाजी! जय काशीविश्वनाथ!!

काशी (काशी)

आश्रम प्रमुख़मांडलिक - 9983748884

पुजारीमांडलिक - 9983748884