।। जय बाबाजी जय बाबाजी।। अनुभव दि. २४/१०/२०२० रोजी रात्री ८ च्या सुमारास माझी साडे चार वर्षांची मुलगी ईश्वरी हिला थोडा ताप जाणवत होता. आदल्या दिवशी पावसात भिजल्याने आणि पाणी बदल झाल्याने तिला थोडी सर्दी झाली होती. मेडिकल मधून तिच्यासाठी सर्दीचे औषध आणले. जेवणानंतर तिला औषध दिले. पण अचानक तिला ताप येऊ लागला, तिचे संपूर्ण शरीर गरम व्हायला लागले, शेजारच्या ताईंकडून तिला तापाचे औषध घेतले आणि तिला पाजले, वाटले होते तिचा ताप कमी होईल म्हणून आम्ही सर्व झोपलो होतो. पण अचानक ईश्वरी जागी झाली. रडायला लागली. आम्ही उठलो बघतो तर तिचे शरीर खुप गरम लागत होते. मनात नको त्या गोष्टी येऊ लागल्या होत्या कारण बाहेर कोरोनाची परिस्थिती. रात्रीचे १२ वाजले असावे आमच्या अर्धांगिनी घाबरून गेल्या. इतक्या रात्री दवाखाना पण उघडा नाही, काय करावे काहीच समजत नव्हते. मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवल्या पण ताप काही कमी होत नव्हता. तिची आई तर रडायलाच लागली. मी उठलो आणि सरळ बाबाजींच्या सिद्धासन असलेल्या फोटोसमोर जाऊन नतमस्तक झालो. बाबाजींना म्हटलो माझे एक टक्के जरी पुण्य असलं तरी माझ्या मुलीचा ताप जाऊद्या. मी फोटोसमोरून भस्म आणि अगरबत्तीची विभूती हातात घेऊन बाबाजींच्या आणि महात्माजींच्या फोटोला लावून घेतली आणि मुलीच्या कपाळाला व सर्वांगाला लावली. थोड्याच वेळात तिचा ताप कमी झाला. मी लगेच उठून पुन्हा बाबाजींच्या फोटोसमोर जाऊन नतमस्तक झालो व बाबाजींचे आभार मानले. अशी महिमा बाबाजींची आहे. करील ते काय नोहे महाराज या उक्तीप्रमाणे बाबाजी भक्तांच्या हाकेला धाऊन येतात. माझी मुलगी माझ्याबरोबर रोज विधी करायला बसत असते. तिला अजून वाचता येत नसले तरी विधीतील कोणता मंत्र चालू आहे हे ती ओळखते. महात्माजीं जे नेहमी सांगतात की भागवत वाचा, भागवत पहा हे ती रोज मी भागवत वाचायला बसलो की म्हणत असते. । ओम जनार्दनाय नमः । मंत्राचा जप ती पूजेच्या वेळी नेहमी म्हणत असते. खरोखरच बाबाजींची माया निराळीच आहे. शेवटी एकच म्हणावसं वाटत जय जय जनार्दन देवा, निरंतर घडो तुमची सेवा. । जय बाबाजी जय बाबाजी । हेमंत बाळासाहेब टिळे मु पो करंजगाव ता. निफाड, नाशिक ९८८१०८४६८८